मुख्याध्यापिका शारदा मुंडे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

कळंब(प्रतिनिधी) : दि.२३ रविवारी डिकसळ येथील स्वप्ननगरी येथे स्वप्ननगरी विचार मंच ,जाधवर व खराटे परिवाराच्या वतीने सेवापूर्तीबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ईटकुर च्या केंद्रीय मुख्याध्यापिका सौ. शारदा सुभाष लाटे- मुंढे यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज होते.
तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डिकसळ नगरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. लक्ष्मी नानासाहेब धाकतोडे, राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जाधवर हॉस्पिटल कळंब चे हृदयरोग तज्ञ डॉ. एल जी. जाधवर, उद्योजक विठ्ठल माने, ईटकुर बीटचे शिक्षणाविस्ताराधिकारी सुशील फुलारी, डिकसळचे उपसरपंच हरिभाऊ कुंभार, कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, राजकीय कट्टाचे संपादक प्राचार्य सतीश मातने , प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. रमेश जाधवर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, इंजिनीयर प्रकाश खराटे, धनराज जाधवर, महादेव खराटे, कळंब तालुका शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे, नानासाहेब धाकतोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता- राष्ट्रमाता जिजाऊ, तसेच स्वच्छतेचे उपासक आज ज्यांची जयंती आहे ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांनी सौ. शारदा लाटे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांच्या कामाचं कौतुक केले. तसेच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात लाटे परिवार नेहमीच आपलं योगदान देणारा असल्याचे आवर्जून नमूद केले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या बाळकृष्ण तांबारे यांनीही शारदा लाटे यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
यावेळी प्राचार्य सतीश मातने, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, ॲड. तानाजी चौधरी, सुशील फुलारी, भाग्यश्री खराटे, प्रकाश खराटे यांनीही आपले विचार व्यक्त करत शारदा लाटे यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा लाटे यांच्या कन्या डॉ. संजीवनी जाधवर यांनी तर सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांनी केले.तसेच आभार शारदा लाटे यांचे सुपुत्र डॉ. ऋषिकेश यांनी मानले.यावेळी या कार्यक्रमासाठी लाटे मित्रपरिवार, नातेवाईक व स्वप्ननगरी रहिवासी खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्तीच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.