महाराष्ट्र

Uddhav Thackeray Group : राज ठाकरेंच्या घरी ‘राजकीय कॅफे’, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray Group Target Raj Thackeray : शिवसेना ठाकरे यांच्या ‘सामना’ मध्ये म्हटले आहे की, भाजपचे इतर नेतेही नियमितपणे राज ठाकरेंच्या घरी चहापानासाठी जातात. मनसे प्रमुखांचे निवासस्थान आता राजकीय ‘कॅफे’ बनले आहे.

मुंबई :- सोमवारी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर यांचे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा केली, त्यानंतर या भेटीची बरीच चर्चा झाली.अशा स्थितीत शिवसेनेचे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये या अटकळांवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे.

राजकारणात कोण कोणाबरोबर आहे ते समजणे सध्या कठीण झाले आहे व महाराष्ट्रातले वातावरण पूर्वीसारखे स्वच्छ राहिलेले नाही. एकमेकांना भेटणे, बोलणे तर दूरच, एकमेकांकडे पाहून हसणेही अडचणीचे ठरत आहे. ही भारताला मोदी-शहाकृत भाजपची मिळालेली देणगी आहे. देशाचा एक प्रकारे कोंडवाडाच झाला आहे. त्यामुळे फडणवीस, मनसेप्रमुख ‘कॅफे’त भेटले त्याची चर्चा होते. मित्रपक्षाला उघडपणे भेटण्याचीही चोरी झालीय. ही काय लोकशाही म्हणायची?

कॅफे’तल्या भेटीगाठी! महाराष्ट्राच्या र राजकारणातील संवाद आणि सौहार्द्र गेल्या काही वर्षांत तर संपले आहे. त्यामुळे दोन भिन्न पक्षांचे लोक एकमेकांना भेटले लगेच भुवया उंचावून प्रश्न विचारले जातात, “हे कसे काय बुवा?” पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजत असल्याचा संशय व्यक्त करून वृत्तवाहिन्या खळबळ उडवून देतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर असे एक शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. या भेटीवर पत्रकारांनी पतंग उडवले, पण ते पतंग काही फार वर गेले नाहीत. शिवतीर्थावरील स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. हे स्मारक सरकार बनवत असल्याने सरकारी भेटीगाठी होणारच. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर बंधने आलेली नाहीत. त्याच दिवशी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस शिवाजी पार्कात छुपा मित्रपक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या भेटीस गेले. त्या भेटीबद्दलही तर्क-वितर्क आणि कुतर्क लढवून बातम्यांचे फुगे हवेत सोडले गेले. ‘फडणवीस-राज’ यांची काय ही पहिलीच भेट नव्हती. भाजपचे इतरही नेते राज यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात-येत असतात. मनसेप्रमुखांचे निवासस्थान हे सध्या राजकीय ‘कॅफे’ बनले आहे व भाजपच्या शेलार, लाड वगैरे अतिज्येष्ठ नेत्यांना त्या कॅफेत राखीव जागा आहेत, पण मुख्यमंत्री जातात व ‘न्याहरी’साठी गेल्याचे सांगतात तेव्हा त्या कॅफेचे महत्त्व वाढते. खरं म्हणजे मुख्यमंत्री गेले यात नवल ते काय? भाजप व राज यांच्या ‘मनसे’ पक्षाची ‘तन-मन-धना’ची युतीच आहे. त्यामुळे युतीतील पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी मुख्यमंत्री तेथे गेले असतील. शिवसेना-भाजप युती असतानाही मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर चहापानासाठी येतच होते, पण आता राजकारण हे इरेला व ईर्षेला पेटले असल्याने कोण कोणाकडे जातात, चहापान करतात यावर मीडियाचे कॅमेरे रोखलेलेच आहेत. शरद पवार हे मधल्या काळात मोठ्या आकाराच्या डाळिंबवाल्या शेतकऱ्यांना घेऊन पंतप्रधान मोदींना भेटले.

सोबत दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनवाल्यांनाही घुसवले. म्हणजे डाळिंबवाल्यांच्या निमित्ताने साहित्य संमेलनवाल्यांचा उद्धार झाला, तरीही शरद पवार पंतप्रधानांना भेटले आणि दोघांत काय शिजतेय वगैरे चर्चांना नुसते उधाण आले. कोणी कोणास भेटावे यावर बंधने नसली तरी केंद्रात मोदी-शहा व महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे वगैरे लोकांचे सरकार आल्यापासून राजकारणातला मोकळेपणा संपला आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जणू एकमेकांचे हाडवैरीच आहेत अशा पद्धतीचे वर्तन सुरू झाले, ते लोकशाही संकेतांना धरून नाही. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते होते व ते काही काँग्रेसवाले नव्हते, पण राष्ट्राची गरज म्हणून नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते सामील झाले. राजकारण्यांच्या भेटीगाठी उघडपणेच व्हायला हव्यात. सध्याच्या डिजिटल युगात लपून तर काहीच राहत नाही. संतांनी सांगितले आहे, “उजेडात पुण्य होते, तर अंधारात पाप होते.” महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे वेश पालटून चेहऱ्यावर मेकअप करून रात्री १२ नंतर लाईटच्या खांबाखाली भेटत होते. हे गुपित स्वतः सौ. अमृता फडणवीस यांनीच फोडले. शिवसेना फोडण्यासाठी शिंदे हे त्या काळात रात्री-अपरात्री दिल्लीत येऊन अमित शहांना भेटत होते. राजकारणात अशा भेटीगाठींना अंत नाही. त्या होतच राहतात. त्यामुळे आताही कोण कोणास व का भेटतात त्यावर चर्चा का करावी? महाराष्ट्राला आता सर्वच पातळींवर खुजे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे त्यांचे विचारही खुजेच असणार. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, स्वतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एकमेकांशी मतभेद असले तरी त्यांच्या भेटीगाठी व संवाद थांबलेले नव्हते. शिवसेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात तर घोर वैचारिक विरोधक श्रीपाद अमृत डांगे यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित केले गेले होते.

शिवसेनाप्रमुखांनी डांगे यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते, पण आता हे घडेल काय? तर अजिबात नाही! त्यामुळे ‘कहां गये वो लोग?’ हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कोणाचा काय पक्ष हे पाहून भेटीगाठी घेत नव्हते. त्यांचे दरवाजे सगळ्यांसाठीच उघडे होते. त्यामुळे लोकशाहीचे खांब मजबुतीने टिकून राहिले. विलासराव देशमुख, शरद पवार, मनोहर जोशी यांच्या काळातही ही दिलदारी दिसून आली. शिवसेनाप्रमुखांचा ‘मातोश्री’वरील दरबार तर सर्व पक्ष व जात-धर्मीयांसाठी खुला होता. मात्र आज महाराष्ट्रात चित्र काय आहे? द्वेष, मत्सर, फोडाफोडीचे राजकारण इरेला पेटले आहे व एकमेकांना राजकारणातून कायमचे खतम करण्यापर्यंत ते पोहोचले आहे. हा बदल मागच्या दहा वर्षांत जास्त झाला. हे असे का घडले? महाराष्ट्रात हे विष कोणी पेरले? यावर एकत्र बसून चिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप या दोन जुन्या मित्रपक्षांचे फाटले व त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा भिन्न विचारांच्या तिघांचे जुळले. हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. भाजपने सत्ता गेल्याचा डूख धरून पुढे विषारी डंख मारला. एकनाथ शिंदे यांना तुरुंगाची भीती दाखवून फोडले व अजित पवारांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवण्याची गर्जनाच देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज हे तिघे एकत्र नांदत आहेत. फडणवीस-शिंद्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने असली तरी मजबुरी म्हणून ते एकत्र आहेत. राजकारणात कोण कोणाबरोबर आहे ते समजणे सध्या कठीण झाले आहे व महाराष्ट्रातले वातावरण पूर्वीसारखे स्वच्छ राहिलेले नाही. एकमेकांना भेटणे, बोलणे तर दूरच, एकमेकांकडे पाहून हसणेही अडचणीचे ठरत आहे. ही भारताला मोदी-शहाकृत भाजपची मिळालेली देणगी आहे. देशाचा एक प्रकारे कोंडवाडाच झाला आहे. त्यामुळे फडणवीस, मनसेप्रमुख ‘कॅफे’त भेटले त्याची चर्चा होते. मित्रपक्षाला उघडपणे भेटण्याचीही चोरी झालीय. ही काय लोकशाही म्हणायची?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0