Umar Khalid : उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो तुरुंगातून बाहेर येणार असून काही दिवस तो कारागृहाबाहेर राहणार आहे.
ANI :- दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद Umar Khalid याला बुधवारी (18 डिसेंबर) न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयाने त्यांना सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.न्यायालयाने उमर खालिदला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उमर खालिदने आपल्या चुलत भाऊ आणि बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 10 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.
डिसेंबरच्या सुरुवातीला उमर खालिद आणि मीरान हैदर यांनी समानता, खटल्याला होणारा विलंब आणि दीर्घ कारावास या कारणांवरून जामीनही मागितला होता. या प्रकरणी पोलिसांनी जबाब सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.2020 च्या दिल्ली दंगलीत 53 लोक मारले गेले आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर उमर खालिदला 13 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. चार वर्षांहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत.
उमर खालिदने सुप्रीम कोर्टात जामीन अर्जही दाखल केला होता, पण कोर्टाने त्याला खालच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर उमरने आपली याचिका मागे घेतली.खालिदवर आयपीसी, 1967 शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.