Maharashtra Politics : विधान परिषद सभापतीकरिता महायुतीकडून प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज
•प्रा. राम शिंदे हे होणार विधान परिषदेचे सभापती!
नागपूर :- 19 डिसेंबरला विधान परिषदेच्या सभापतीची निवड होणार आहे. महायुतीकडून विधान परिषदेच्या सभापती पदाकरिता प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल उपस्थित होते.
विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर महायुतीच्या नेतेमंडळींनी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. राम शिंदे हे जवळपास सभापती म्हणून निश्चितच झाल्याचे पाहायला मिळत आहे. राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मंत्री पदासाठी माझ्या नावाची चर्चा असताना मला भाजपकडून सभापती पदासाठी संधी मिळाली आहे. अनेक वेळा काही पदे मिळत असतात काही पदे न मानता मिळत असतात. सभापती झाल्यानंतर निश्चितच राज्यातील जनतेला जास्तीत जास्त न्याय कशाप्रकारे मिळेल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. असे राम शिंदे यांनी म्हणाले आहे.
राम शिंदे 8 जुलै 2022 रोजी राज्य विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये (2014-19) मंत्री म्हणून काम केले. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) नेते रोहित पवार यांच्याकडून अल्पशा फरकाने पराभव झाला होता.2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पवारांनी त्यांचा पराभव केला होता.