मुंबई
Trending

Panvel News: राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

पनवेल जितिन शेट्टी : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11व्या वर्षी शानदार आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा जळगाव केंद्र येथून स्पर्धा प्रमुख तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ झाला.
या वेळी समर्थ कला बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव, परीक्षक अरविंद मराठे, मानसी दोशी यांच्यासह अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या टीममधील अमोल खेर, गणेश जगताप, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, जळगाव केंद्र प्रमुख विशाल जाधव उपस्थित होते.
नाट्य चळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या स्पर्धेची प्राथमिक राज्यातील विविध केंद्रांवर होऊन अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारीदरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून 100हून अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.
स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय 75 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0