IND vs NZ : मुंबईत न्यूझीलंडने रचला इतिहास, टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव
•मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने गमावला.
BCCI :- मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने गमावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा मुंबई कसोटीत 25 धावांनी पराभव झाला. भारतात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा व्हाईट वॉश करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.
टीम इंडियाने 1933-34 मध्ये पहिल्यांदा घरच्या भूमीवर कसोटी मालिका खेळली, जी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका होती, ज्यामध्ये इंग्लंडने 2-0 ने विजय मिळवला. आता भारतात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 ने पराभूत करणारा न्यूझीलंड हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने ही ऐतिहासिक कामगिरी केली. 1933 पासून पाहिले तर जवळपास 91 वर्षांनंतर टीम इंडियाला 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य होते. छोट्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अनेकवेळा फसला. संघाने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट 13 धावांवर गमावली, त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया थांबली नाही.भारताने अवघ्या 29 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. हतबल झालेल्या टीम इंडियाला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 121 धावांवर ऑलआऊट झाली. यादरम्यान ऋषभ पंतने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 64 धावा केल्या.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 235/10 धावा फलकावर ठेवल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 263/10 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा संघ अवघ्या 174 धावांत सर्वबाद झाला आणि टीम इंडियासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले.इथून टीम इंडिया जिंकेल असं वाटत होतं, पण दुर्दैवाने टीम इंडियाने 121 रन्सवर ऑलआऊट होऊन मॅच गमावली.