Anti Corruption News |पुण्यात जीएसटी विभागातील महिला अधिकारी ॲण्टी करप्शनच्या जाळ्यात
Anti Corruption News
पुणे, दि. 6 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)
जीएसटी क्रमांक मंजुर करण्यासाठी ३ हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या महिला अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वस्तू व सेवाकर विभागात कार्यरत महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
श्रीमती. मालती रमेश कठाळे, वय ४३ वर्ष, पद राज्यकर अधिकारी, वस्तु व कार्यालय सेवाकर विभाग, येरवडा, पुणे (वर्ग-२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
आज दि. 6 रोजी वस्तु व सेवाकर कार्यालय, (GST) येरवडा येथे कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने नवीन जी.एस.टी. नंबर घेण्यासाठी वस्तु व सेवाकर विभागास ऑनलाईन अर्ज केला असून, त्यासाठी २५००/- रुपये भरले होते. सदरचे प्रकरण लोकसेविका श्रीमती. मालती कठाळे यांचेकडे प्रलंबित होते. लोकसेविका श्रीमती. मालती कठाळे यांनी तक्रारदार याना समक्ष बोलवून नवीन जी.एस.टी. नंबर मंजुर करून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे ३०००/- रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेविका मालती कठाळे यांनी तक्रारदार यांचेकडे नवीन जीएसटी नंबर देण्यासाठी ३०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन, लोकसेविका मालती कठाळे यानी तक्रारदार यांचेकडून रक्कम रुपये ३,०००/- (तीन हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.