Saptshrungi Devi Navratri : सप्तशृंगी देवी,108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या आद्य शक्तीपीठ!
Saptshrungi Devi Navratri : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन “आर्धे शक्तीपीठ” झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.
हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व – पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.
गडाचा आणि देवीचा इतिहास
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे कि दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानक पणे महादेव यांना कळत की कोणी तरी तपश्चर्या करत आहे ते बघण्या करिता ते दत्तगुरू याना पाठवता व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ”शाबरी विद्या”ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात.
देवीचे भव्यरूप
देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी / शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.