Pune Crime News | धक्कादायक : मार्केटयार्ड खुन प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करताच झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली !
- आरोपी जेरबंद झाला असता तर एकाचा जीव वाचला असता
- आता प्रशासकीय स्तरावर जबाबदार कोण?
पुणे, दि. ३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर | Pune Crime News
पोलीस प्रशासनावरील राजकीय दबावामुळे कायद्याची झालेली वाताहत आता विक्राळ रूप घेत आहे. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरक्षकाने वस्तुनिष्ठ तपास करत, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता परंतु याच कारणाने त्या पोलीस अधिकाऱ्याला रोषाला सामोरे जात बदलीचे बक्षीस स्वीकारावे लागले होते. काल मार्केटयार्ड परिसरात झालेल्या निर्घृण हत्येत पुन्हा तोच आरोपी सहभागी असल्याने आता प्रशासकीय स्तरावर जबाबदार कोण? असे विचारायची वेळ आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना परिस्थितीजन्य पुरावे, पार्श्वभूमी, गुन्हेगारी हालचाली यांच्यावर जरब ठेवणे आवश्यक असते. अशातच काहीवेळा राजकीय हित दुखावले तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करावी लागते. पुण्यात काही दिवसापूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने अशीच एक कारवाई करत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहींवर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा दाखल होताच दबावाखाली त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली झाली. आता याच गुन्ह्यातील आरोपीकडून एकाच निर्घृण खून करण्यात आला आहे.
तो गुन्हेगार त्या गुन्ह्यात आत मध्ये असता तर कदाचित आज एका निष्पाप जीवाचा बळी गेला नसता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फ्री हॅन्ड मिळणार का?
हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना फ्री हॅन्ड मिळणे गरजेचे आहे. खास करून राजकीय वरदहस्त व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करताना फ्री हॅन्ड आवश्यक आहे.