Narayan Rane : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती’, नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ
Narayan Rane News : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतच्या व्यापाऱ्यांची लूट केली होती, असे शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते आणि आता भाजप नेते नारायण राणे यांनीही असेच विधान केले आहे.
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच काँग्रेसवर हल्लाबोल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे Narayan Rane यांचे वक्तव्य आले असून ते म्हणाले की, मी इतिहासकार नाही, पण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून जेवढे वाचले, ऐकले आणि जाणले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती.
एका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार नारायण राणे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावर राजकारण करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पुढे येऊन शांततेचे आवाहन करायला हवे होते. मात्र विरोधक या घटनेचा वापर करून वातावरण बिघडवत असल्याचे उघड आहे. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देश सोडून जाण्यास सांगितले होते, त्यावर आक्षेप घेत नारायण राणे म्हणाले की, त्यांना असे वक्तव्य करण्याचा काय अधिकार आहे? ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का? मी मुख्यमंत्री असतो तर उद्धव ठाकरेंवर कडक कारवाई केली असती.
शिवसेना (ठाकरे ) नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘सुरतेचा एक व्यापारी गट होता, ते ईस्ट इंडिया कंपनीला पैसे द्यायचे. त्यांच्या सुरक्षेसाठी पैसे द्यायचे. स्वराज्याच्या विरोधात होते. छत्रपती शिवाजींनी अशा व्यापाऱ्यांना लुटण्याचा निर्णय घेतला कारण ते ईस्ट इंडिया कंपनीला संरक्षण रक्कम देत होते. हा अत्यंत राष्ट्रहिताचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मानून छत्रपती महाराजांनी सुरतवर हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळा आहे.