Sharad Pawar On Maharashtra Band : शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे केल आवाहन
मुंबई :- ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदचा निर्णय हा अवैध असल्याचे सांगितले आहे. तसेच बंद पुकारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही हायकोर्टाने दिला आहे. बदलापूर घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हा बंद केवळ दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु या आव्हानाल गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हाय कोर्टात या विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच हायकोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी बंद मागे घ्यावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे.
बदलापूर येथील एका शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने उद्याचा बंद बेकायदा असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले?
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (24 ऑगस्ट) रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.