Jitendra Awhad Tweet : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधान बद्दल जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
•महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या मोहम्मद पैगंबर बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात राजकीय आणि तणावग्रस्त पडसाद
मुंबई :- महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर शहरातील रस्त्यावर मोठा जमाव आला होता. रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जमावानं केली होती. विशेष म्हणजे रामगिरी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वैजापूर तसंच येवला येथंही गुन्हे दाखल आहेत. राज्याच्या विविध भागात रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याविरोधात संतापाचं वातावरण पाहायला मिळतय. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की
काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता , हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते. मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे. कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही.
सत्ता येते अन् जाते. पण, एकदा मने दुभंगली की ती जोडता – जोडता आयुष्य निघून जाते. या द्वेषाच्या राजकारणापासून आपण सर्वांनीच लांब रहायला हवे.