Sunday Mega Block : रविवारी (28 जुलै ) रेल्वेचा मेगाब्लॉक, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा..
मुंबई लोकल रेल्वे सेवा: आज पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगा ब्लॉक, मध्य आणि हर्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई :- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.रविवारी लोकलने प्रवास करणे मुंबईकरांसाठी खूपच त्रासदायक ठरणार आहे.कारण 28 जुलै 2024 रोजी म्हणजेच रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. बोरिवली ते भाईंदर अप- डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.
रविवारी हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी 11.05 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर पनवेल येथून ठाणेकरता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बरवरील लोकलसेवा सुरू राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 4.35 वाजेपर्यंत बोरिवली ते भाईंदर अप आणि डाउन धीम्या मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकलसेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉग कालावधीत काही लोकलसेवा रद्द असणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.