Vijay Wadettiwar : सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून ठेंगा! काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार याची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्याचे महाविकास आघाडीचे नेत्यांनी टीका केली आहे, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा काय दोष? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला असून, तर महाराष्ट्राला सावत्र वागणूक रोहित पवार यांचे टीका
मुंबई :- केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काही न मिळाल्याने आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले की सर्वात जास्त करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या वाटेला ठेंगा आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दोष काय? असा सवाल उपस्थित केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा!देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे
महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत
भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र
आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य..महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!
आदित्य ठाकरे यांचा सवाल, महाराष्ट्राचा काय दोष?
मी समजू शकतो की बीजेपी आपले सरकार वाचवू इच्छित आहे आणि बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्प देऊ इच्छित आहे. पण महाराष्ट्राचा काय दोष? की आपण सर्वात मोठे करदाते आहोत? आम्ही जे योगदान दिले त्याविरुद्ध आम्हाला काय मिळाले? अर्थसंकल्पात एकदाही महाराष्ट्राचा उल्लेख होता का? Bjp महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? ही काही पहिलीच वेळ नाही, गेल्या दशकभरात भाजपच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राविरुद्ध हा पक्षपात आपण पाहिला आहे. असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मिंधे राजवटीतील भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट. हेच आपल्याला तोंड द्यावे लागते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांचे ट्विट
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला.
कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते.
हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या bargaining आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे.