CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न
CM Eknath Shinde At Pandarpur : पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री यांच्यासह सोळा वर्षापासून वारी करणाऱ्या नाशिकच्या शेतकरी दांपत्याला मिळाला मान
पंढरपूर :- दुमदुमली पंढरी..पांडुरंग हरी… विठ्ठल विठ्ठल जय हरी… या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर विठ्ठलमय झाले असून एकच जयघोष पंढरपुरात चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी सपत्निक महापूजा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले की, हे बा.. विठ्ठल माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग याला घातले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी मंजूर 73 कोटी 80 लाखाच्या निधीअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट आहेत. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने 4 ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा आतापर्यंत 8 लाख नागरिकांनी लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. पंढरपुरात लवकरच 1 हजार बेड क्षमतेचे नवीन रुग्णालय बांधण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मागील 16 वर्षांपासून वारी करत असलेल्या (अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक) येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे, आणि पत्नी आशाबाई बाळू अहिरे या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. एसटी महामंडळाकडून त्यांना 1 वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण व समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदूत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, डॉ. तानाजी सावंत, दीपक केसरकर, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.