BMW Hit And Run Case : BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा याला अटक, मुंबई पोलिसांची 14 पथके शोध घेत आहेत.
•बीएमडब्ल्यू ‘हिट-अँड-रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला दोन दिवसांच्या शोधानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
मुंबई :- मुंबईतील बीएमडब्ल्यू ‘हिट-अँड-रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची 14 पथके दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. मिहीरला परदेशात पळून जाऊ नये यासाठी लुक आऊट सर्कुलर नोटीस ही जारी करण्यात आले होते. रविवारी पहाटे वरळी परिसरात झालेल्या अपघातानंतर शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर फरार झाला होता. मिहीरचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते आहेत. आरोपी मिहिर शहा याला विरार फाटा येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात 105,281,125 (ब), 238,324 (4) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 184,134 (अ), 134 (ब), 187 मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये दाखल करण्यात आले आहे. तुला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी मिहिर शहा याला 11 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमक काय घडले?
अपघाताच्या वेळी शिवसेना नेत्याचा मुलगा मिहिर शाह (24 वर्ष) हा बीएमडब्ल्यू कार चालवत होता, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुख्य आरोपी मिहीरने रविवारी सकाळी मुंबईतील वरळी परिसरात स्कूटरला धडक दिली, या अपघातात स्कूटरस्वार कावेरी नाखवा (45 वर्ष) हिचा मृत्यू झाला, तर तिचा पती प्रदीप जखमी झाला.
शिवसेना नेत्याला जामीन मंजूर, ड्रायव्हरला अटक
बीएमडब्ल्यू कार शिवसेना नेते राजेश शहा यांची असल्याचे तपासात समोर आले आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक राजर्षी बिदावत हेही मिहीरसोबत होते. अपघातानंतर राजेश आणि त्याचा ड्रायव्हर राजर्षी यांनी मिहिरला पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे अपघातानंतर काही तासांनी रविवारी दोघांना अटक करण्यात आली. त्याना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी तिघांविरुद्ध अनेक आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने राजेश शहा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून चालक राजर्षी बिदावत याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, नंतर राजेशला जामीन मिळाला.