मुंबई

Cleanliness Drive : ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोली ते दिघा सखोल स्वच्छता मोहीम उत्साही लोकसहभागातून संपन्न

नवी मुंबई : महामार्गांवर नेहमीच वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामध्ये बांधकाम साहित्याचीही मोठया प्रमाणावर वाहतूक होते. या वाहतूकीमध्ये रस्त्यावर पडणाऱ्या रेतीचे धूळीत रुपांतर होऊन प्रदूषणात वाढ होते तसेच नियमीत वाहतूक सुरु असल्याने महामार्गांची सखोल स्वच्छता करण्यास मर्यादा येतात. त्या अनुषंगाने महामार्गांच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महामार्गांवर लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे प्रदूषण कमी होईल शिवाय नागरिकांच्या आरोग्यातही सुधारणा होईल असा विश्वास नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत आज ठाणे – बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वे स्टेशनपासून दिघा तलावापर्यंत ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र यांच्या समवेत ऐरोली व दिघा भागातील विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक व एनएसएसच्या विदयार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.

नवी मुंबई हे राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केलेले देशातील व्दितीय क्रमांकाचे स्वच्छ शहर असून स्वच्छता ही कायम करण्याची गोष्ट असल्याने पावसाळयातही मोहीम राबविण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यादृष्टीने शनिवारी सायन-पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली व आज ठाणे-बेलापूर महामार्गावर मोहीम राबविण्यात आली.

नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, त्यातही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारी स्वच्छतेसारखी बाब त्यांच्या नियमीत सवयीतूनच यशस्वी होईल हे लक्षात घेत नागरिकांनी घरातूनच कचऱ्याचे दैनंदिन वर्गीकरण करावे तसेच आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले.

यादृष्टीने स्वच्छतेसाठी सोसायटयांना प्रोत्साहीत करण्याकरीता ‘स्वच्छ सोसायटी स्पर्धा’ घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोठया सोसायटीतील ओल्या कचऱ्याची नाविन्यपूर्ण रितीने विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटयांसाठीही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती दिली. याशिवाय प्रत्येक सोसायटीने आपला अंतर्गत परिसर स्वच्छ राखण्यासोबतच आसपासचा रस्ताही स्वच्छतेसाठी दत्तक घ्यावा व शहर स्वच्छतेत आपले अनमोल योगदान दयावे असेही आवाहन आयुक्तांनी केले.

ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्यासह सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची व पर्यावरण संरक्षणाची सामुहिक शपथ घेऊन सखोल स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यामध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे स्वत: सहभागी झाले व त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त तथा दिघा विभाग अधिकारी डॉ.कैलास गायकवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री.अशोक अहिरे, सहा.आयुक्त श्री.शशिकांत तांडेल, श्री.सुनिल काठोळे, श्री.संजय तायडे, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे व श्री.मनोहर सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.सतीश सनदी, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता मित्र, विविध स्वयंयसेवी संस्था व मंडळे यांचे पदाधिकारी व नागरिक आणि विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सक्रीय सहभाग घेतला. या मोहीमेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

या सखोल स्वच्छता मोहीमेत व्यापक लोकसहभागाच्या आयुक्तांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन ऐरोली ज्येष्ठ नागरिक संघ, संत निरंकारी महाराज सेवा मंडळ, सेवानिवृत्त पोलीस संघ, सुशिलदेवी देशमुख विदयालयाचे एनएसएस विद्यार्थी युनिट व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, कागद अशा स्वरुपाचा 70 गोणी सुका कचरा गोळा करण्यात आला.

अशा प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा मुख्य मार्गांवर नियमीतपणे राबविल्या जाणार असून स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी निर्देशित केले. शहर स्वच्छतेसाठी लोकसहभागावर भर देत त्रयस्थ निरीक्षण ठेवून चांगल्या प्रकारच्या स्वच्छतेला प्राधान्य राहील असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0