Chhatrapati Shivaji Maharaj Statue Update : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.2 कोटी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा
मुंबई :- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडी या मुद्द्यावरून महायुती सरकारची चांगलीच कोंडी करत आहे. विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलने करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.
पुतळ्याच्या दर्जावरून सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता पुतळ्याच्या किंमतीच्या जवळपास जाईल इतका खर्च तात्पुरत्या हेलिपॅडवर झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार एक्सवर पोस्ट करत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे 2.02 कोटी… वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.
78 लाख, 44 लाख अणि 79 लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेंबर 2023 मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते.
तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!