क्राईम न्यूजमुंबई
Trending

“मुंबई पोलिसांचा निर्धार: अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा जागर!”

Mumbai Police Latest News : 15 दिवसांत 4500 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले मार्गदर्शन, 15,000 हून अधिक मुंबईकरांमध्ये जनजागृती

मुंबई | 26 जून – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने भव्य जनजागृती मोहीम राबवली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत 12 ते 26 जून 2025 या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा साजरा करण्यात आला.

वाहन रॅली, पथनाट्य, स्टिकर्स, पत्रके आणि डी-ॲडिक्शन सेंटर भेटींच्या माध्यमातून परिणामकारक जनजागरण

या मोहिमेंतर्गत मुंबईतील मालवणी, कांदिवली, बोरीवली, कस्तुरबा मार्ग, समतानगर, कुरार व दिंडोशी परिसरात वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीतील वाहनांवर अंमली पदार्थ विरोधी संदेश असलेले बॅनर व स्टिकर्स लावले गेले. या उपक्रमात शैलेंद्र कॉलेज, दहिसर येथील एन.एस.एस. विद्यार्थी आणि अभिजीत प्रोडक्शन, एरोजी यांच्यातर्फे नशेच्या दुष्परिणामांवर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी 150 ते 200 विद्यार्थी आणि 50 एन.जी.ओ. सदस्यांची सक्रिय उपस्थिती होती.

सामाजिक भान जपत, अंमली पदार्थ विरोधी कक्षाने पाच डी-ॲडिक्शन सेंटरना भेटी देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच, जनजागृती अभियानात एकूण 40 शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगणारे मार्गदर्शन सत्र घेतले गेले, ज्यामध्ये 4500 विद्यार्थी सहभागी झाले.

मुंबईच्या गर्दीच्या परिसरांमध्ये – रेल्वे स्थानके, शाळा, महाविद्यालय परिसर – अंमली पदार्थांविरोधी स्टिकर्स लावण्यात आले व हजारो पत्रकांचे वाटप करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. पथनाट्य सादरीकरणासाठी मुंबईभर 7 ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या संपूर्ण अभियानाच्या माध्यमातून सुमारे 15,200 मुंबईकरांपर्यंत पोहचत अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे सामाजिक आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे विविध सामाजिक संस्थांकडून व पालकांकडून विशेष कौतुक होत आहे.

मुंबई पोलिसांची ही मोहिम केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर भावी पिढीला सुरक्षित ठेवण्याचा व्यापक सामाजिक संकल्प असल्याचे स्पष्ट दिसून येते.

पोलीस आयुक्त, देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अं.प.वि. कक्ष सुधीर हिरडेकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षा अंतर्गत कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, वरळी युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, घाटकोपर युनिट पोलीस निरीक्षक अनिल ढोले, बांद्रा युनिटचे पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, पोलीस निरीक्षक प्रशासन बाळासाहेब शिंदे यांनी आयोजित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0